• Sutradhar Blog

मी आणि माझी कला आजच्या जगात...

लेखक: संतोष गायकवाडनाटक या कलेचं माध्यम मला जास्त भावलं म्हणून की काय मी नाटक करण्याचा निर्णय घेतला.आता नाटक तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आयुष्यात तो करतच असतो.अगदी लहानपणापासून. शाळेत जायचं नसेल तर 'पोट दुखतय' म्हणून जे नाटक करायला सुरुवात झाली तेच नाटक आज मुलांना शाळेत घेऊन येण्यासाठी, त्यांना शिकण्याची, वाचनाची गोडी लागावी म्हणून करताना फार गंमत वाटतेय...

नाटकाचं रितसर प्रशिक्षण घेऊन 'अभिनय करायचा'हे एकमेव ध्येय मनात ठेवून शहरात आलो.प्रशिक्षण सुरु होऊन ते संपलही.ते संपता-संपता नाटक आणि एकंदरीत माझ्या कलेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता...प्रेक्षकच माय बाप असं म्हणत रंगमंचावर आलो .परंपरेने सगळेच हे करतात.मग माझी कला कुठे वेगळी आहे? मी करतो तेच सगळे करतात मग माझ्यात असं वेगळं काय आहे...? मी जे नाटक करतो ते मनोरंजनच करत,पण त्याचा पुढे काय फायदा..? मग या सगळ्यातून काय मिळतं..? समाधान, आनंद, की फक्त कौतुक... जे क्षणभंगुर असतं. नाटक का करायचं...? गेल्या अनेक दिवसांपासून डोक्यात रेंगाळत पडलेला प्रश्न. उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजही सुरुच आहे.अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला नाटक करायला भाग पाडते.मला आवडत,छंद आहे,मला त्यात करियर करायचय अशी वरवरची उत्तरं मिळाली पण तरीही प्रश्न उरतोच की नाटकच का करायचं...? खाज असणं आणि ती जिरवणं एवढच की अजुन काही... आत्मीक आनंदाचा निरंतर चालू असलेला शोध म्हणून नाटक करायचं का..?पण आनंद तर अनेक गोष्टीत असतो. मला मिळालेलं उत्तर कितपत खरं आहे हे सांगणं तसं फार तथ्याचं आहे की माहीती नाही... सुरुवातीला जेव्हा नाटक करताना मंचावर उभा राहतो तेव्हा अशी कुठली गोष्ट असते जी तुम्हाला रंगमंचाच्या अवकाशात हरवून टाकते, आणि उजळलेल्या प्रकाशात आपणच आपल्याला नव्याने शोधलेलं असतं का...? ते शोधण्याची अनुभूती आणि त्यातुन मिळालेला आनंदच वारंवार नाटक करायला भाग पाडतं.तो एक क्षण असतो जो काल्पनिक का होईना पण नविन जीवन जगण्याची संधी देतो.अनेकदा ग्लँमर आणि हिरोगीरी सुद्धा नाटक करायला लावते.कुठलतरी उद्दिष्ट असल्याशिवाय नाटक नाही करता येतं...

आधी आनंद मग जरासं रेंगाळणं परत नविन आशा मग नाटक मंचावर येतं आणि संपल्यानंतर परत तिच उदासिनता आणि नविन संहितेचा शोध...आधीच्या पात्राला निरोप आणि नविन पात्राचं आगमन...हे चक्र सतत सुरु राहतं आणि हे रुटीनचा भाग कधी होतं हे ही समजत नाही. नाटक करत राहणं हे माझं ध्येय होत आणि ते पुर्ण करायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. आणि या ओढीने वाचन वाढलं.चर्चा वाढत गेल्या... जाणारा प्रत्येक दिवस आणि त्यासोबत येत जाणरं नाविण्य हे उत्साह देत राहतो.नाटक रोजच प्रत्यक्ष मंचावर नाही होत पण मनात मात्र सतत सुरु राहतं

माझ्या कामाने समाज बदलू शकत नाही पण याचा योग्य वापर केला तर नाटक हे माध्यम वापरून काही तरी करावं,पण काय...? या विचारांचा प्रवास सुरु असताना मला नवीन रस्ता मिळाला.लहान मुलांना गोष्ट सांगणे...खरंतर नाटकात एम.ए.पुर्ण करुन नेट करावं असे सल्ले मला अनेकजण देत होते.मला त्या गोष्टीचं आकर्षण नाही वाटलं कारणं नेट पास होऊन नौकरी मिळेपर्यंतचा सगळा काळ आपण आशेवर जगण्यात घालवतो.नाटक शिकण्यासाठी औरंगाबादला येण्यापूर्वी मी वस्त्यांवर जायचो ,बचतगटाच्या कामानिमित्त तिथल्या मुलांची अवस्था फार भयानक होती.वर्गखोल्यात मुलांऐवजी शेळ्या बांधलेल्या असायच्या.ते पाहून काहीतरी करावं असं वाटून गेलं होत.तेव्हाच मुलांसोबत काम करायचं मी मनोमन ठरवलं होतं.त्याचं झालं असं की 'गोष्टरंग फेलोशिप' दरम्यान नाटक आणि शिक्षण याविषय खुप चर्चा ,संशोधन आमची गोष्टरंगची टिम करत होती.तिथेही आम्ही आमच्या कलेचा वापर एका वेगळ्या पद्धतीनं करत होतं.गोष्टींच नाटक करुन आम्ही मुलांना दाखवत होतो.अर्थात ते करण्यामागं विचार होता,तो असा की मुलांनी पुस्तकांशी मैत्री करावी,त्यांनी वाचवं...। माझ्या नाटकापेक्षा खरच हे वेगळं होत. चार भिंती,अंधार... लाईटस्, म्युझिक, कर्टन याच्याही पलिकडे जावून माणसाला माणसात घेऊन जाणार होतं हे नाटक.त्यानं काय झालं...? सतत भिती मनात ठेवून ,कुबट वर्गखोल्यात विद्यार्थी म्हणून जगत असताना मुलांच्या चेहऱ्यावर कसलच हास्य दिसत नाही. नाटक काय असतं ? कसं दिसतं ? त्यात काय असतं ? हे तिथं काहीच माहिती नव्हतं.आणि माझी कला इथपर्यंत पोहचली पाहिजे हा विचार मनात सुरू झाला आणि हिच माझी खरी प्रेरणा होती.काहीच नसलेल्या जागेत काहीतरी नवीन तयार करणं हेच कलेचं मुळ समजलं जात. यादरम्यान मुंबई सुद्धा भुरळ पाडत होतीच.ग्लँमर कुणाला नको असतं.पण तिथे जावून समाधानापेक्षाही मनाला अशांत करणारे अनुभव आले असते.मला ते नको होते.कलावंत असुनही तुम्ही तिथे कुणाच्यातरी भरवशावर बसून राहता आणि तुम्हाला काम मिळत नाही. "हेल्पर्स आँफ दी हँन्डीकँप" या शाळेत 'स्पेशल'मुलांसाठी स्पेशल शो करण्याची संधी आम्हाला मिळाली.सगळीच मुलं स्पेशल नाहीत. मुळात ते स्पेशल आहेत हि जाणिवच त्यांना करुन दिली जात नाही. इतकं मस्त वातावरण.इथले शिक्षकही स्पेशल आहेत.ते इथेच शिकलेत आणि याच मुलांसाठी काम करतायत.रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना शिक्षण दिलं जातं.त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य खुप सकारात्मक उर्जा देऊन जातं... "खुप आवडलं..."अशी अडखळत , बोबड्यासुरात मिळालेली प्रतिक्रिया खुप काही देऊन गेली... सांगायचं तात्पर्य इतकच की,आपल्या आजुबाजुला करण्यासारख्या खुप गोष्टी आहे.तुमच्या शिक्षणाचा,तुमच्या कौशल्याचा वापर चांगल्या कामासाठी होऊ शकतो.गरजेचं नाही की कंपनीच असावी,संस्थाच असावी.तुमची ,तुमच्या शिक्षणाची,तुमच्या कलेची खरच आज खुप गरज आहे .फक्त तुमची इच्छा आणि समाजाप्रती आपुलकी पाहिजे...

(नाटकाचं शिक्षण घेणारे खास करुन) 'काहीच होत नाही,' 'कामचं मिळत नाही 'म्हणून कुढत बसण्यापेक्षा ,निराश होण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या कलेचा वापर कुठे होईल हे शोधलं तर निराशा पदरी पडणार नाही. सिनेमा ,सिरीयल आणि त्यातलं यश हे मृगजळासारखं आहे.हे कळून यायला वेळ लागतो.झटपट प्रसिद्धीचं आणि पैसा मिळवण्याचं हे माध्यम आहेच.पण त्याहीपेक्षा इथे असतो प्रचंड तणाव. कुठल्याच गोष्टीची शाश्वती नसलेलं हे क्षेत्र.प्रयत्न ,ज्याला आपण 'स्ट्रगल'असं सो काँल्ड नाव दिलय आणि "मी आता 'स्ट्रगल' करतोय "असं जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्या 'करतोय' मागे 'मी सध्या काहीच करत नाही'हे वाक्यही मनात रेंगाळत असतं.आणि आपण त्याकडे बिंधास्त दुर्लक्ष करतो.हे सांगण्या खुप अभिमान असतो पण त्यामगे असते प्रचंड धावपळ...निराशा...फस्ट्रेशन...आस कला कुठलीही असो तिचा मुख्य उद्देश आनंद देणं हाच असतो.आणि आपण तो तेव्हाच देऊ शकत़ो जेव्हा आपण तो घ्यायला शिकू.आनंद घेऊन काम करता आलं पाहिजे. अर्थात आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची कलाच असते.कोणी ओरडतो,कोणी हसतो तर कोणी शांत राहून आनंद उपभोगत असतो. इच्छा असेल तर कला तुम्हाला जगण्याचा मार्ग दाखवते.पण फक्त एकच एक धरून न ठेवता तुमचा "अभिनय" आणखी कुठे कामाला येऊ शकतो याचाही विचार केला तर कदाचित तुमच्या 'स्ट्रगलची' गती कमी होईल आणि आरामात तुम्ही काम करु शकता.मुळात मेहनत आवश्यक असते हेही समजून घेतलच पाहिजे... "खचून जावून स्वतः ला संपवण हा पर्याय असू शकत नाही आणि निराश होऊन व्यसन करणही..."

अनेकजण मला हेच विचारतात की ,"तुम्ही काय करताय..?" आणि जे काही करताय त्याचा काही फायदा आहे का...?

मला वाटतं प्रत्येक गोष्टीत फायदा असतोच असं नाही पण परिणाम मात्र नक्कीच असतो.जर एखाद्या वाईट गोष्टीने मुलांवर वाईट परिणाम होतो असं आपल्या सुज्ञ पालकांना वाटत असेल तर एखादी चांगली गोष्ट मुलांमध्ये बदल घडवू शकते यावर मात्र त्यांचा विश्वास बसत नाही.आणि म्हणून मुलांना वाईट गोष्टी पासून चार-पाच हात लांबच ठेवायचं...? पण त्यांना हे कळत नाही की,म्यँच्युअर होण्याचा तो काळ आपण त्यांच्या पासून लपवून नाही ठेऊ शकत. नेमकं सगळं हेच आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत.शाळांमध्ये, मुलांमध्ये जाऊन त्यांचं जगणं समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काही करु शकतो का..? तर आमच्यासाठी त्याचं उत्तर 'हो' असच आहे.

अगदी साधी गोष्ट आहे ,घरात हल्ली मुल रडायला लागलं की त्याच्या हातात सहज आपण मोबाईल देतो.मग त्याला गाणी ऐकवली जातात.युट्यूब वर कार्टून्स दाखवलं जातं आणि एक दिवस असं होतं की, 'मोबाईल शिवाय आपलं मुल जेवण करुच शकत,' नाही असं त्या बिचाऱ्या आईला वाटायला लागतं. मग त्याच्यावर या माध्यमांचा इतका मारा सुरु होतो की,प्रत्यक्ष जगणं,अनुभवणं हे सारं ते विसरतात.सगळं रेडीमेड उपलब्ध होतय म्हणून कल्पना करण्याची कल्पनाही त्यांच्या आसपास भटकत नाही...

आधी आजी किंवा आई गोष्ट सांगायची तेव्हा ती गोष्टं डोळ्यासमोर उभी करण्यात आपण गुंतायचो.गोष्टीतली पात्र आपण जिवंत करायचो.नंतर ती आपल्या अवतीभोवती वावरल्याचा भासही व्हायचा.या सगळ्यांचा अनुभव त्यांना मिळत नाही. त्यांच सगळं विश्व स्क्रीन च्या आत तयार होतय...एका चौकटीत.वाचन करणं फार कमी होतय,प्रसंगी एकटं राहणं,समुहाची सवय न होणं हे सगळं घडायला सुरुवात होते,आणि पालक कौतुकाने"तो लहानपणापासून तस्साचय" असं म्हणून मोकळे होतात...

गोष्टरंग या क्वेस्टमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात आम्ही मुलांसाठी लिहीलं गेलेलं साहित्य त्यांच्यापर्यंत घेऊन जातो.या प्रकल्पातुन मुलांना गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव देऊन पुस्तकाकडे वळवणं,गोष्ट सांगण्यातली गंमत काय असते हे दाखवणे,गोष्ट सांगण्यासाठी आणखी काय काय आपण करु शकतो हे जर मुलांना कळायला लागलं तर ते समुहात येऊन ते सगळं करायला लागतील...एकमेकांना टाळी देत हसतील,खिदळतील...जरासा दंगा करतील... आणि सगळ्यात महत्त्वाचं ते गोष्ट वाचायला लागतील... असा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

अर्थात ही गोष्ट स्क्रीन वर बोटं फिरवण्याईतपत सोपी नक्कीच नाही. त्याला वेळ द्यावा लागेल.आपण जन्माला घातलेली मुलं ही लहान मुलं आहेत आणि प्रत्येक वयात त्यांची गरज वेगळी आहे पालक म्हणून आपण समजून घ्यायला हवं...

या सगळ्या प्रवासात मला जे काही मिळालय ते माझ्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचलं पाहिजे या उद्देशाने आज प्रयत्न सुरु केले आहेत.प्रत्येक भागाची गरज वेगळी आहे.त्या त्या गरजा समजून घेऊन नाटक या माझ्या माध्यमाचा आता कसा उपयोग याविषयी संशोधन सुरु केलय....


203 views0 comments

Recent Posts

See All

Creations and Expressions of creativity through words, art, performances by the members of Sutradhar Writer's Club and Sutradhar Art Club Creativity has no bounds, no rules, no regulations. It's your