
Sutradhar Blog
कलेचा रंग, सर्वांसाठी!
लेखक: मधुरा आफळे
शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम होता. संपूर्ण प्रेक्षागृह लोकांच्या आवाजाने, गप्पा मारण्याने, एकमेकांच्या भेटीगाठी यानी जिवंत वाटत होतं. मात्र माझ्या शेजारी बसलेली काही मुलं नुसतच बसून इकडे तिकडे पहात होती.
तिसरी घंटा झाली... लाईट बंद झाले आणि पडदा उघडला. समोर नृत्याची सुरूवात झाली. मी स्वतः नृत्य कलाकार असल्याने अत्यंत तन्मयतेनी ते नृत्य मी पाहू लागले. पण थोड्याच वेळात माझ्या शेजारी मला चुळबुळ जाणवू लागली. मगाशी माझ्या शेजारी शांत बसलेली मुलं आता मात्र काहीशी अस्वस्थ होऊ लागली. अगदी सहज माझ्या कानावर काही वाक्य आली. "अरे,किती बोर होतय यार.. काही कळतच नाहीये!" हे ऐकलं आणि एक वेगळाच विचार मनाला चाटून गेला.
अगदी पूर्वी पासून पाहिलं तर कला ही समाजासाठी कायमच एक मनोरंजनाचं साधन म्हणून राहीली आहे. मन रमवण्यासाठी, स्वतःला आनंद घेण्यासाठी, मनाला विरंगुळा म्हणून पूर्वापार सगळे कलेचा वापर ती आत्मसात करून किंवा अनुभवून सर्रास करताना दिसतात. पण खरच कला फक्त मनोरंजनच करते का? मनाला आनंद, विरंगुळा देणं याच्या पलीकडे काही तिचं अस्तित्व आहे का? हा आनंद फक्त कलाकारापर्यंतच मर्यादित राहतो का? कला ही कलाकार आणि प्रेक्षक यांना याही पलिकडे काही देऊ शकते का?
मनामधे इतके सारे प्रश्न पडले आणि लगेचच पं. मनीषाताईंचे वाक्य आठवले. आम्ही सर्व जणी गेली अनेक वर्ष पं. मनीषाताई साठे यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेत आहोत. त्यांच्याकडे ही कला शिकत असताना कायम त्यांच्या तोंडून एक वाक्य एकत आलो आहोत," कला ही नेहमी समाजाभिमुख असावी!" म्हणजेच कलेचे सादरीकरण हे कायमच समाजाला डोळ्यासमोर ठेवूनच करावे. हा असा प्रेक्षकांमधला अनुभव आला आणि हे वाक्य मनोमन पटलं.
अशा अनुभवांमुळे आणि ताईंच्या संस्कारांमुळे आमचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि सूत्रधारची सुरूवात झाली. गेल्या 2 वर्षात खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही शास्त्रीय नृत्यकला आणि त्यातील आनंद हा समाजापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
कोणताही कलाकार जेव्हा एखादी कला शिकतो तेव्हा सहाजिकच त्यावर मक्तेदारीची भावना तयार होते. ती कला आपल्याला समजली, आपण आत्मसात केली ही भावना कलाकाराच्या मनात येणं खूपच सहाजिक आहे. पण जेव्हा समाजाचे भान येते किंवा समाजाचा विचार येतो तेव्हा ही कला आपली मक्तेदारी नाही तर कलाकार म्हणून ही कला समाजापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव कलाकाराला नक्कीच होते. आणि त्यानंतर मात्र ही कला केवळ प्रस्तुती करणार्या कलाकाराची न राहता, ती कला पाहणाऱ्या, अनुभवणार्या समाजातील प्रत्येक घटकाची होऊन जाते.
याच जाणिवेतून आणि विचाराने आमच्या पहिल्या मोठ्या प्रस्तुतीचा जन्म झाला "I story, मी गोष्ट, मैं कहानी.."
समाजातील प्रत्येक माणसाला रुचेल, कळेल असेच सादरीकरण करायचे हा विचार तर होताच, पण नृत्य हे माध्यम वापरताना त्या माध्यमाची ताकद आणि त्याच बरोबरीनी त्याच्या मर्यादांची सुद्धा पूर्ण कल्पना होती.
I story च्या संपूर्ण प्रवासात हेच दोन विचार प्रामुख्याने विचारात घेतले गेले. "कथा कहे सो कथक केहेलावे" या कथक नृत्य साठीच्या उक्तीप्रमाणे आम्ही संवाद साधतच नृत्य सादर करावं याला प्राधान्य दिलं.
सादरीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर विषय हाताळताना नृत्य या माध्यमाचा पुरेपूर वापर केला आणि वेळोवेळी जिथे मर्यादा जाणवली तिथे त्याला साहित्याची, संगीताची, नाट्याची जोड दिली. लोकांपर्यंत विचार पोहचवण्यासाठी या सगळ्या कला हातात हात घालून आमच्या मदतीला आल्या.... सगळे रंग एकमेकांत मिसळले आणि शास्त्रीय नृत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देशाने, आणि या कलांच्या साथीने उभं राहीलं आमचं पहिलं सादरीकरण.
तेच नाट्यगृह होते. .. तीच लोकं... तोच पडदा...तोच जिवंतपणा...
लाईट बंद झाले,पडदा उघडला आणि सुरु झाले...
" नमस्कार...
I story...
मी गोष्ट. .
मैं कहानी. ."