• Sutradhar Blog

माझी कला आणि मी

लेखिका: भार्गवी देशमुख

‘सा कला या मानसं मोदयति।'

जी मनाला आनंद देते ती कला अशी कलेची साधी व्याख्या केली जाते. रोजच्या आयुष्यात अश्या कितीतरी कला आहेत ज्या आपल्याला आनंद देतात. अंगणात सकाळी सुंदर रांगोळी काढणं असेल,वेगवेगळ्या चवी एकत्र करून स्वयंपाक करणं असेल किंवा देवासमोर टाळ्यावाजवित आरती म्हणणं..अश्या अनेक रूपांनी चित्रकला,पाककला,संगीत इ. आपल्या दैनंदिन जीवनात आनंद पेरत असतात.त्या आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग असतात,त्याचबरोबर आपल्या जडणघडणीत अधिक श्रेयदेखील त्या घेतात.यासगळ्या कलाप्रकारांमधील एखादी कला काही लोकांना आपलंसं करून टाकते, मग त्यांना ती आनंद देण्याचाही पलीकडे कुठेतरी घेऊन जाते,त्यांच्या जगण्याची सोबती होते.सुदैवाने मी त्या काही लोकांच्या गटात मोडते आणि माझ्यासाठी ती एखादी कला म्हणजे 'नृत्य'. जन्मापूर्वीपासून,भाषेच्याही आधी माणसाला हालचालींची ओळख होते.हृदयाचे ठोके जाणवण्याची सुरुवात होते अगदी त्या क्षणापासूनच नाद अंगात भिनायला लागतो.हालचालींचे आणि नादाचे हे समीकरण माणसाच्या उमलण्याच्या प्रक्रियेपासूनच त्याच्या अंतरंगात रुजत जाते.खरे पाहता,माणूस जिवंत आहे की मृत हे हृदयाच्या ठोक्यांचा नाद आणि त्यासोबत त्याच्या हालचालींनुसारच तर कळते! यावरूनच आपल्याला या दोन तत्वांच आपल्या आयुष्यात असलेलं महत्व सहज समजू शकेल.माणूस मोठा होत जातो तसं त्याला त्याच्या स्वतःच्या आणि निसर्गातील हालचालींचे भान येते आणि मग जागरूकतेने त्याला 'नृत्याच्या' परिभाषेत उलगडून बघण्याचा काहींचा शोध सुरू होतो... तसा माझाही झाला. कलाप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात योग्य मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे असते.तुम्ही आणि तुमच्या कलेतील तो एक महत्वाचा दुवा असतो.माझ्या या कलाप्रवासात तीन वेगवेगळ्या शहरातील,तीन वेगवेगळ्या धाटणीचे गुरु मार्गदर्शक म्हणून भेटले.लहानपणी कथक नृत्याचा पाया पक्का केला तो रमा करजगावकर यांनी.त्या जळगांव वरून साधारण दोन महिन्यातून एकदा नृत्यवर्ग घेण्यासाठी नांदेडला (माझ्या मूळ गावी) येत असत.साहजिकच दोन नृत्यावर्गांमधील अंतर बरंच असल्यामुळे (एखाद्या गाण्यावर) सहज,आयती नृत्यसंरचना करून मिळणं किंवा पडलेल्या प्रश्नांची लगेच उत्तरं मिळणं हे नेहमी शक्य होईलच असे नसायचे.यामुळेच एक फायदा झाला की,प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा ध्यास लागला,स्वतःसाठी स्वतः नृत्य बसविण्याचा विचार सुरू झाला,आणि नृत्यशिक्षणाबद्दल ओढ लागली.हीच ओढ पुढे मला अजिबात स्वस्थ बसू देत नसल्यामुळे आई बाबांनी मला नाशिकला कीर्ती भावळकरांकडे येऊन-जाऊन नृत्यशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.8-9 तास रेल्वेचा प्रवास करून मी (सोबत आई किंवा बाबा) नृत्यवर्गात पोहोचत असु.पुढचे 2-3 तास त्या वातावरणात राहायला मिळल्यामुळे मी भारावून गेलेली असे.याच काळात कलाकार सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवू शकतो,स्वतःचा राजा होऊ शकतो, वेगवेगळ्या शक्यतांचा परीघ रुंदावता येणं त्याला शक्य असते यासगळ्यांची मोठ्ठी कलाकार मंडळी पाहून खात्री पटायला लागली. या गोष्टीमुळे ‘कला आपल्या आयुष्याला परिपूर्णता देऊ शकते’ हा विचार शाश्वत वाटू लागला.यामुळेच कलेला बराच काळ डावलाव लागेल अश्या कुठल्याच क्षेत्रात माझा वेळ घालवण्यासाठी माझी तयारी होत नव्हती.थोड्याच दिवसात एका तेजस्वी नृत्यांगणेबद्दल वाचण्यात आलं आणि मग माझी ही खात्री अधिक ठोस वाटायला लागला.ती तेजस्वी व्यक्ती म्हणजे पुण्याच्या गुरू रोहिणी भाटे.कालाविश्वाच मर्म जाणणाऱ्या या व्यक्तीच्या परिघात नृत्य शिकण्याची ऊर्मी मनात शिरली आणि त्याला लगेच वाटही मिळाली.रोहिणी ताईंच्या शिष्या शर्वरी जमेनिस यांच्याकडे नृत्याचे धडे घेणं सुरू झालं आणि माझ्या नृत्यशिक्षणाला नवी दिशा लाभली.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामधून उच्च माध्यमिक शिक्षणही पूर्ण केलं.या काळात माझा कलाविश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला आणि कलेला कलेच्या शुध्द रुपात बघण्याचे धैर्य मिळाले. यासोबत ओघातच नम्रता,चिकाटी,सातत्य,शिस्त अश्या अनेक गुणांनी माझी ओंजळ भरून गेली. आता कलाप्रवासाच्या या नव्या टप्यावर येऊन असे लक्षात येते की, इतर कुणाहीपेक्षा आपल्या आतल्या संवेदनाच मला माझ्या कलाप्रवासाची योग्य वाट दाखवू शकतील. माझ्यामते एखाद्या कलेला आपला सोबती करणं जेवढं सुखद आहे तेवढंच आव्हानात्मक देखील आहे. आई होतांना जसे अनेक मोह बाईला टाळावे लागतात,प्रसूतीवेदना सहन कराव्या लागतात आणि मग एक कोवळा जीव तिच्या पदरात पडतो.कलानिर्मितीची प्रक्रिया देखील याहून फारशी वेगळी नाही. कलाकार म्हणून जमवलेलं संचित, कलाकार म्हणून

मनात असलेली हुरहूर, तगमग सारं काही पणाला लागते तेंव्हाकुठे एक उत्तम कलानिर्मिती होते. मग अशी कला माझ्या निखळ अभिव्यक्तिमधून निर्माण झालेलं चैतन्य होते.. अशी कला माझ्या माणुसपणाचं खरं सौंदर्य होते.. अशी कला माझ्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाचं उद्दिष्ट होते... बस!

असंच काहीसं नातं आहे, माझं आणि माझ्या कलेचं.

398 views1 comment

Recent Posts

See All