• Sutradhar Blog

माझी कला आणि मी | प्रभाकर मठपती

Updated: May 17, 2020

माणसाच्या जडणघडणीला त्याच्या भोवतालचा समाज कारणीभूत असतो. तो समाज त्या माणसाला चांगल्या-वाईट तसेच जुन्या-नव्या वाटा दाखवत असतो. माणूस जन्माला आल्यापासून तो माणूस किंवा समाज घटक होईपर्यंत हा समाजंच त्याचं अप्रत्यक्षपणे संगोपन करत असतो. मग तो माणूस समाजघटक बनतो. मग हळूहळू त्याला समाजातल्या अनेक गोष्टी कळायला लागतात. आणि त्यासोबतच त्याला स्वतःच्या आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितींची ओळख होते. जाणिव होते. खरंतर ही जाणीव योग्य वेळी होणं गरजेच असतं, परंतु ती जाणीव बऱ्याचदा योग्य वेळी होत नाही. म्हणून कला आणि इतर गोष्टी बऱ्याच अंशी आपल्यापासून दूरच राहतात; त्यांची ओळख होत नाही. आपल्या प्राथमिक गरजा भागल्यावर माणूस कलेकडे वळतो असं म्हंटलं जातं आणि बऱ्याचदा हे माझ्या लक्षातही आलं. जिथे प्राथमिक गरजाच अपुऱ्या ठरतात तिथे माणसाला कलेची ओळख तरी कशी होईल?मीसुद्धा एका तशाच खेड्यातला मुलगा जिथे बर्‍याच कारणांमुळे कला पोहोचली नाही. काही परंपरागत चालत आलेल्या कला होत्या, ज्या आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्यात बाजूला पडून गेल्या. मला लहानपणापासूनंच गाणं म्हणायची आणि नकला करण्याची आवड होती. ही आवड पुढे सुद्धा कायम राहिली. माझ्या प्राथमिक शैक्षणिक काळात फक्त तालुका किंवा  जिल्हा पातळीवर काही सांस्कृतिक घडामोडी घडायच्या आणि त्या तिथेच संपायच्या सुद्धा. त्या आमच्या गावात किंवा आमच्या शाळेत कधीच पोहोचल्या नाहीत. त्या कलेच्या घटना घडामोडी आमच्यापर्यंत पोहचवणारं सुध्दा कोणी नव्हतं. मी मात्र या सर्व गोष्टींना कंटाळलो होतो. मला माझं शिक्षण कलेकडे वळवायचं होतं. परंतू कलेबद्दल माहिती मिळेल किंवा आपल्याला एखादी कला आत्मसात करता येईल, याची माहिती देणारी खूप कमी माणसं वाट्याला आली. ज्यांना कलेच्या वृंदावनात मानाचे स्थान, ज्यांचा कलेच्या प्रांगणात सन्मान ती माणसं मात्र खेड्यापासून, खेड्यातल्या पोरांपासून, खेड्यातल्या कलाकारांपासून कोसो दूर होती. आणि त्यांची नजर कधी चुकूनही आमच्याकडे वळणार नव्हती. आजही तीच परिस्थिती आहे. माझ्या कलागुणांना वाव देणारे एक-दोन शिक्षक होते त्यांनी काही मार्ग मला सूचवली. त्या मार्गापासून मला माझी आर्थिक आणि गावातली मानसिक परिस्थिती मागे ओढत होती. परंतु बिघडलेल्या राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीपुढे मला माझी आर्थिक आणि गावाची मानसिक परिस्थिती अत्यंत कमी महत्त्वाची वाटली. मी त्याच पद्धतीच्या परिसरात बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आणि कलेच्या प्रांतातली गरजेपुरती माहीती घेऊन, 'कधी स्वप्नातही विचार न केलेल्या औरंगाबाद शहरात मी नाट्यशास्त्राचे पदवी शिक्षण घ्यायला आलो.'शिकण्याच्या आवडीनं मला माझं गाव सोडायला भाग पाडलं होतं. गाणं म्हणण्याची, कथा सांगण्याची आणि नकला करण्याची आवड असलेला मी एका योग्य ठिकाणी येऊन पोहचलो होतो. संगीत, नृत्य तसेच नाटक यांचं शास्त्रोक्त पद्धतीचं शिक्षण दिलं जाणारं शैक्षणिक वातावरण मला लाभलं. वयातली महत्त्वाची वर्ष सुख दुःखासोबत चार हात करत जगत आलो होतो. माणसाचं जगणं डोळसपणे बघत आलो होतो. त्यामुळे अनुभव आणि संवेदना या गोष्टी खूप आतपर्यंत साठलेल्या होत्या; ज्या नाटक शिकताना, त्यातली पात्र समजून घेताना कामी येत होत्या. माझ्या गावाकडची शैक्षणिक पातळी जरी जेमतेम असली तरी मातीत जगलेले क्षण मात्र खूप बळकट होते. पदरातल्या अनुभवाच्या जोरावर नाटक समजून घेत गेलो आणि त्याला जोड मिळत गेली ती योग्य शैक्षणिक वातावरणाची. गावाकडच्या किंवा आत्तापर्यंत जगत आलेल्या, बघत आलेल्या काळाकडे एका अभ्यासू दृष्टीने पाहण्याची सवय लागत गेली. त्यामुळे माझी प्रबोधनापेक्षा उद्बोधनाची पातळी समृध्द होत गेली. आणि अत्यंत प्रामाणिकपणे तसेच मेहनतीने केलेल्या कामाची पावती तर शिक्षकांकडून वेळोवेळी मला मिळतंच होती. इतर शिक्षण देणारी शिक्षक मंडळी आणि तिथे शिकणारी मुलं यांच्यातला शैक्षणिक संबंध कुठल्या पातळीचा असतो माहीत नाही परंतू नाटकाच्या सानिध्यात जगणारी शिकणारी माणसं मात्र माणूसकीच्या पातळीवरची असतात. आणि ती एकमेकांच्या पुढ्यात येतात ते माणूस म्हणूनंच. आणि तिथेच सुरुवात होते कलेतल्या योगदानाला; कलेच्या देवाणघेवाणीला. मला योग्य वेळी योग्य गोष्टी मिळत होत्या. याच काळात पुस्तकांची सोबत मिळाली. काही माणसं  पुस्तकातून कळली तर काही प्रत्यक्ष. "आपल्या सहवासातली माणसं अत्यंत प्रामाणिकपणे पुस्तकातल्या माणसांबद्दल बोलतात, तर पुस्तकातली माणसं अत्यंत पोटतिडकीने आपल्या सहवासातल्या आणि आपल्या भोवतालच्या माणसांबद्दल बोलतात" हा अनुभव दरवेळी आला. आजही येतो. हे माणसांचं, पुस्तकांचं सगळं बोलणं फक्त बोलणं न राहता माझ्यासारख्या विद्यार्थ्याला कलाकार म्हणून समृद्ध करण्याची ती लक्षणं होती. मी कलाकार म्हणून समृद्ध होणं मलाही आवडत गेलं. आणि कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मी कुठपर्यंत आलो याकडे वेळोवेळी सिंहावलोकन करत राहिलो. "फलान्याचा मुलगा काहीतरी शिकून काहीतरी मोठा साहेब झाला आणि गरजेपेक्षा जास्त पगारीवाला झाला, म्हणून माझ्याही पोरानं तेच करावं" असा एक समज सर्व स्तरावरील सर्वच घराघरात पाहायला मिळतो. परंतु माझ्या घरानं मला माझ्या शिक्षणासाठीचं स्वातंत्र्य मी गाव सोडतांनाच बहाल केलं होतं. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची घटना होती. मी जे नाट्यशिक्षण घेतोय त्याबद्दल माझं घर थोड्याफार प्रमाणात अनभिज्ञ आहे, परंतू माझ्यावर मात्र त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे. याच विश्वासाला पात्र ठरत मी निश्चितपणे माझं ध्येय पूर्ण करेन, या आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं मी पदवी पूर्ण करुन आज नाट्यशास्त्रातंच एम.ए.चं शिक्षण घेतोय. कलेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेला संबंध, कलेचा शोध आणि नवं काहीतरी शिकण्याची जिज्ञासा मला इथवर घेऊन आली. मी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आणि कलेच्या दृष्टीने मागास प्रांतातून आलो आणि आत्मविश्वासानं चालू चागलो. माझ्या यशस्वी वाटचालीला ईजा करु पाहणार्या अनेक मानसिकता मी अनुभल्या. त्यासोबतंच अनेक पातळ्यांवरून झालेला त्रासही मी सहन केला. पण कलेला आद्य मानणाऱ्या पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात हा त्रासदायक अनुभव क्वचितंच आला. या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट कळली ती म्हणजे, 'शिकण्याच्या इच्छेपुढे सर्वच समस्या या दुय्यम ठरतात.' बर्याचदा मला असं वाटतं की, माणूस म्हणून निरागस जगणं मी गमावलं की काय? परंतु त्याचक्षणी माझ्यातला कलाकार मला सांगतो की, नाही. तुझ्या निरागसतेला एक नवी दृष्टी प्राप्त झाली.आज मी जे शिकतोय ते माझ्यासोबतंच माझ्या एका मोठ्या समूहाला उपयोगी पडणारं आहे. मला तिथे जायचंय जिथून मी आलो आहे. मला तिथे 'ते' न्यायचंय ज्यासाठी मला तिथून बाहेर पडावं लागलं. या सगळ्या गदारोळात माझ्याकडून माझी जन्मभूमी कधी सुटणारंच नाही, परंतू मला माणूस आणि कलाकार म्हणून समृद्ध केलेली 'ही' जागा मात्र मी कधीच विसरणार नाही. कारण, या दोन्ही जागा मला माणूस आणि कलाकार म्हणून सतत जागं ठेवतात.About the Author:

Prabhakar Mathapati is from Ghungrala, (घुंगराळा) Nanded. He's pursued B.A. Dramatics

from Saraswati Bhuvan Arts and Commerce College, Aurangabad and M.A.Theatre

from Lalit Kala Kendra Pune University. He currently lives in Pune, pursuing Theatre and Acting and working on direction, playwriting, songwriting as well.Cover Photo Credits: Kapil Japtap

295 views0 comments

Recent Posts

See All