• Sutradhar Blog

माझी कला आणि मी

लेखक: वैभव लव्हाळे


'कविता म्हणजे आरसा' ही कवितेसंबंधातली सुरेश भटांची ओळ कुठल्याही कलाकाराला (आर्टिस्टला) त्या-त्या कलागुणांना सामोरे ठेवून अगदी चपलख लागू पडते. त्यामुळे एक कलासक्त आणि कलाकार याअर्थाने मीही या ओळीस अपवाद ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काहीएक वर्षांपूर्वी लिहिलेले माझे लेख आज मलाच अंतर्मुख करतात. मला माझं विचारविश्व कसं विस्तारत गेलं इथपासून ते माझे आदर्श कसे बदलत गेले इथपर्यंत.सगळंच. उदाहरनार्थ

मी बारावीला असतानाची ही कविता,

#सारे ब्रह्मांड तेजात न्हावे... उजळूदे लक्षदीप सारे तिमिर लयाला जावे, कर्तृत्वाने तुमच्या सारे ब्रह्मांड तेजात न्हावे... गृहासी तुमच्या सदा सर्वदा मांगल्य वस्ती यावे, मनोरथ माझे हेच स्वये पांडूरंगे पूर्ण करावे...

यातील कुठेतरी शब्दांचा मारा होता आणि माझं आराध्य पांडुरंग याला जबरदस्तीने त्यात घुसडण्याचा प्रयत्नही होता.

आणि ही काहीएक महिन्यांपूर्वी लिहिलेली कविता,

#आरक्त माझा हुंदका... आरक्त माझ्या वेदनांची आसवे तेंव्हा व्यक्त झाली, माझ्याच हुंदक्यांनी जेव्हा साथ ती अभिव्यक्त केली, मग उसासा तो दाबुन माझा मी हुंदका तो घेतला, येवढ्यानेच त्या हुंदक्याशी सलगी वाटु लागली.

या कवितेत भावना माझ्या आणि माझ्यासाठी आहेत. बहिःस्थ वृत्ती लोप पावल्याचा प्रत्ययही आहे.

(त्यावेळी) माझ्या या प्रवासाची सुरुवात जरी 'कविता' या तुलनेने सौलभ्यता असणाऱ्या वाङ्मयाने झाली तरी आता मात्र त्याचा विस्तार प्रासंगिक लेख, समीक्षात्मक लेख, पथनाट्य, लघुनाट्य असा प्रवास करीत आता लघुकथा, वैचारिक कविता, प्रवासवर्णन आणि प्रदीर्घ नाट्यलेखन अशा उंबरठ्यावर उभी आहे. तथाकथित 'प्रकाशित साहित्य' या सदरात यांपैकी खूपच कमी गोष्टी असल्या तरी त्यांची व्याप्ती 'सकसता आणि रसिकता' यांचा शिरपेच लेऊन उभी आहेत.

खरं म्हणजे मी नव्या पिढीचा लेखक आहे पण न जाणो का मी ज्यांना पाहिलंही नाही अशा अनेक लेखकांचा आणि कवितांचा प्रभाव माझ्यावर खूप आतपर्यंत आहे. अगदी ऋग्वैदीक ऋषींच्या आर्षकाव्यातील गुढगम्यतेतील लयबद्ध रचना मला अजूनही विस्मयात टाकतात. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांचा 'विवेकसिंधु' त्याच्या नितळ शब्दप्रवाहाने मोहवून टाकतो. आणि भरीत भर म्हणून की काय ज्ञानेश्वरांची 'ज्ञानेश्वरी' मला अजूनही अर्थदृष्ट्या आणि शब्ददृष्ट्या नित्यनूतन वाटत राहते. माउलींनी संस्कृत शब्दांचे मराठीकरण केले यात नवल नाही तर माउलींनी मराठी शब्दांचेही मराठीकरण केले हा माझ्यासाठीचा अधिक विस्मयाचा भाग. म्हणून माऊली सहज लिहुही शकले, "माझा मराठाची बोल कौतुके, ते अमृतातेही पैजा जिंके".

या प्रभावाने खूपदा माझी कविता जरा वैचारिक विश्वाला अध्यात्माची गरज का आहे हे सांगण्यासाठी सरसावते. ही पसायदान नावाची कविता त्याचा सारांशच सांगते.

#पसायदान... मागण्याचे प्रयोजन आज मी फेकून दिले, होते उराशी बांधलेले सारेच आज सोडून दिले, निश्वास आता सोडला मी निश्चिंततेच्या दारावरी, पसायदान ज्ञानेशाचे विश्वात्मकाच्या चरणावरी..

माऊलींनंतर येणारे एकनाथ, मुक्तेश्वर आणि स्त्रीकवी यांच्या रचना मला प्रासादिक आणि गोड वाटतात कारण त्यांचा विषय हा रोजच्या व्यवहारातील होता. त्यानंतरचे संतकवी म्हणजे रामदास आणि तुकाराम. या मातब्बर तत्ववेत्त्यांच्या काव्य लिखाणाने नुसती सामाजिक जाणीव रुजवली नाही तर कवितेतील माधुर्यता आणि कठोरता यांच्या वैचित्र्यपूर्ण सहजबंध घडवून आणला. त्यानंतर येणारे 'पंडितीकाव्य' हे तर माझ्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे. कारण पंडिती काव्यात सौलाभ्यता आणि गेयता वरवर जरी वाटत असली तरी ती 'सौलाभ्यता' आणि 'गेयता' काव्यात उतरावी यासाठी मोठा प्रपंच आहे. या काळानंतर येणारे साहित्य माझ्यासाठी एक स्थित्यंतराचा (ट्रान्सफॉर्मेशन) काळ वाटतो. कविता अजूनही राहिली पण गद्य वाङ्मय भरभरून लिहिले गेले आणि ललितलेख, कथा, कादंबरी अशा गोष्टीही पुढे आल्या. या काळात माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्यांची संख्या खरोखरच खूप जास्त आहे पण ज्यांच्या ओळी आणि वाक्ये मी नेहमी गुणगुणत असतो ते म्हणजे बहिणाबाई, बालकवी, गडकरी आणि पुढे गदिमा, केशवसुत, करंदीकर, कुसुमाग्रज, सुरेश भट, पुलं, तेंडुलकर, बोरकर, वपु अशी ही फळी. या सगळ्या मंडळींना वाचून माझ्यासमोर समग्र असा वस्तुपाठच उभा राहिला.

मी जेव्हा कुठल्याही लेखकाचे साहित्य वाचतो तेव्हा ते वाचण्यापूर्वी त्या लेखकाची वैयक्तिक पार्श्वभूमीसुद्धा (बॅकग्राऊंड) मुद्दाम पाहतो. त्यावरून मला जे कळालं की ही सर्व मंडळी अगदी सर्वसामान्य घरातील आणि त्यांच्या लिखाणाचे चे विषय देखील सर्वसामान्य. (अर्थात काही अपवाद वगळता.) तरीही या सर्वांनी सकस आणि प्रशंसनीय असं साहित्य निर्माण केलं. आणि हाच माझ्या कवितांच्या आणि लेखांच्या मागचा मार्गदर्शक विचार (डियरेक्टीव्ह थॉट).

यावर्षी पुलंची जन्मशताब्धी आणि त्यामुळे त्यांच्या ओळीनेच या लेखाच्या समारोपाकडे वळूयात. पुलं एका ठिकाणी लिहितात की 'मला साहित्यावर खूप प्रेम करायचे आहे आणि माझी एकमेव चिंता एवढीच की मी ते पुरेसं करू शकत नाही.' या ओळी मला नेहमी विचार करायला भाग पाडतात की ज्या व्यक्तीचं आयुष्य फक्त साहित्यसेवेत गेलं त्या व्यक्तीला अजूनही मृत्यसमयी फक्त साहित्यसेवा करायची इच्छा आहे. आणि म्हणूनच पुलं साहित्यिक म्हणून अजरामर आहेत यात नवल नाही तर माझ्यासारख्या या भटक्या नावेसाठीदेखील पुलं एक 'दीपस्तंभ' आहेत.


276 views2 comments

Recent Posts

See All